कवी मंगेश पाडगावकर (१० मार्च १९२९ - ३० डिसेंबर २०१५) 

poetry Mangesh Padgaonkar

जन्म - १० मार्च १९२९ (वेंगुर्ला, सिंधुदुर्ग)

स्मृती - ३० डिसेंबर २०१५

कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला.

     शाळेत असल्यापासूनच मराठीवर त्यांचं प्रेम जडलं आणि वयाच्या १४ व्या वर्षापासूनच ते कविता करू लागले.

     कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि बा. भ. बोरकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. परंतु, पाडगावकर एका साच्यात कधीच अडकले नाहीत. त्यांनी स्वतःची शैली निर्माण करून मराठी साहित्यात आणि रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं.

     स्वतः प्रेमळ व्यक्ती, प्रेमळ प्राध्यापक असल्यानं प्रेम कवितेवर त्यांचं विशेष प्रेम होतं. पण, भावगीतं, बालकविता, निसर्गकविता, चिंतनशील कविताही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे केल्या होत्या. त्या सादर करण्याची त्यांची पद्धत तर अफलातून होती. सहज सोप्या शब्दांतून व्यक्त होणारे बोल आणि ओठांवर सहज रुळणाऱ्या कविता पाडगावकरांनी दिल्या. 

     मंगेश पाडगांवकरांची कविता-गीतं म्हणजे मोगऱ्याची टपोरी फुलं. आपल्या कवितेतली, गीतांतली आशयघनता सातत्याने टिकवलेला हा श्रेष्ठ कवी. त्यातल्या अनेक कवितांची गाणी झाल्यानं साहित्यासोबतच संगीत क्षेत्रातील पाडगावकरांचं योगदानही मोठं आहे. 


Mangesh padgaonkar book
Mangesh Padgaonkar Book

     पाडगावकरांनी "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" असं म्हणत मराठी रसिकांना प्रेम करायला शिकवले. जगण्याचं बळ देणारे "अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती" अशा सहजसोप्या शब्दांत जीवनाचं सार त्यांनी सांगीतले.

     ते आपल्या कवीतांनी तरुणाईला प्रेमात पाडत असत. "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं" असं म्हणणारे 'पाडगावकर आजोबा' कॉलेज मधल्या मुला-मुलींचे मित्रच होऊन जायचे. 

     भावकविता, भावगीते, बालगीते, संगीतीका, नाट्य काव्य, गझल, वात्रटिका, सामाजिक उपरोधपर कविता, बोलगाणी आणि विडंबन अशा विविध साहित्य प्रकारातून पाडगावकरांनी वाचकांना समृध्द केले.

त्यांना मिळालेले पुरस्कार :

   मंगेश पाडगावकरांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. 'सलाम' या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

   महाराष्ट्रातील रसिकांच्या मनात मानाचे स्थान मिळवलेल्या पाडगावकरांना २००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

   २०१० मध्ये दुबईत झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

   २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला होता.

महाराष्ट्र टाइम्सनंही पाडगावकरांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं गौरवलं होतं. 

मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी निधन झालं.