त्र्यंबक बापूजी ठोंबरे


मराठी साहित्य क्षेत्राला व्यापक इतिहास आहे. अनेक मराठी साहित्यीकांनी या क्षेत्रात दिलेले योगदान आजही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. जुन्या काळातील काही साहित्यीकांची साहित्य संपदा आजही मार्गदर्शक ठरणारी आहे. अशा अजोड साहित्यीकांमध्ये त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे एक आहेत 

त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणून ओळखले जाते. मराठी साहित्यात आजही बालकवींचे स्थान अजोड आहे. गत काळावरही मात करीत बालकवींची कविता आजही तितकीच उत्कट प्रत्यय देणारी, रसिक मनाला भुरळ पाडणारी आहेत.
 

bal-kavi-phool-rani
Balkavi



ऑगस्ट १८९० साली धरणगाव येथे बालकवींचा जन्म झाला. बालकवींचे वडील बापूराव देवराव ठोंबरे आणि आई गोदाताई. बापूराव पोलीस खात्यात असल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत. त्यामुळे बालकवींच्या शिक्षणात सतत खंड पडत गेला. मात्र त्या त्या गावातील निसर्गाने बालकवींना समृद्ध केले. ज्येष्ठ भगिनी जिजींच्या सहवासात पंडिती काव्याचे वाचन त्यांनी केले. जिजींमुळे बालकवींमध्ये कवितेची आवड निर्माण झाली. पुढे नाशिकला संस्कृत तर पुण्यात त्यांनी इंग्रजीचे अध्ययन केले.


वडीलांच्या निधनानंतर बालकवींची परिस्थिती हलाखीची झाली. त्यात कौटुंबिक स्थितीही चांगली नव्हती. बालकवींचे कौटुंबिक जीवन सुखी नव्हते. त्यातच आईच्या आत्यंतिक आग्रहामुळे बालकवींचा विवाह १६ फेब्रुवारी १९०८ साली झाला. परिस्थितीला तोंड देत बालकवी वेगवेगळ्या नोकऱ्या करीत पोटासाठी धडपडत होते. त्याचा परिणाम बालकवींच्या काव्यावर झाल्याचे आढळते. 


नाद, गंध, रंग, रूप, स्पर्श या संवेदनांची लयलूट असणा-या निसर्गोत्सवाचा आविष्कार करणारे बालकवी १९०३ पासूनच ते कविता करीत होते. त्यांना निसर्गाची ओढ बालपणापासूनच होती. या वयातच त्यांना राष्ट्रीय कीर्तनकार वनवासी उपाख्य रामचंद्र कृष्ण वैद्य यांचा सहवास लाभला. अशा विविध व्यक्तिमत्त्वाच्या संस्कारांनी बालकवींचे भावविश्व संपन्न होत गेले. 

१९०७ मध्ये जळगाव येथे झालेल्या पहिल्या महाराष्ट्र कविसंमेलनामुळे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना 'बालकवी' या नावाने महाराष्ट्र ओळखू लागला. या कविसंमेलनाने बालकवी साहित्यरसिकांना ज्ञात झाले

 
निसर्गाच्या सहवासात बालकवींनी जीवनाचे अनेक रंग अनुभवले. बालसुलभ कुतूहल, आनंदाने विभोर होण्याची निखळ, निरागस वृत्ती यामुळे ते निसर्गाशी समरस होऊ शकले. या निसर्गातच बालकवी रमले.
निसर्गाची मधुर गाणी बालकवींनी गायिली. निसर्गाकडे सर्व सामान्यांपेक्षा वेगळ्या नजरेने बालकवी बघत होते. सृष्टीचे स्वरूप आनंदमय आहे. सृष्टीत सर्वत्र आनंद कोंदून भरलेला आहे असे ते मानत होते. निसर्गात त्यांना सादर्याचा साक्षात्कार होतो. या सादर्याचा बालकवींना ध्यास लागलेला होता. निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण करताना त्यांना जी सुंदरता अनुभवास येई, तिलाच त्यांनी शब्दात साकार केले आहे. आनंदाने बेभान होण्याच्या या वृत्तीमुळे सगळीकडे आनंदकंदाचा प्रत्यय त्यांना येतो आणि 'इकडे तिकडे चोहिकडे' मधून तो उत्कटपणे अभिव्यक्त होतो. 


पण त्याच बरोबर ही आनंदाची उत्कटता अनुभवायची असेल तर सगळी बंधने झुगारून देऊन, स्वार्थापलीकडचा विचार करीत, मत्सर, द्वेष, हेवेदावे सगळे विसरून; स्वच्छ, निर्मळ मनाने निसर्गाकडे जाणे महत्त्वाचे असल्याचे बालकवी नमूद करतात. बालकवींच्या अशा निर्मत्सर निर्मळ मनामूळे, या भूवर प्रत्यक्ष स्वर्गच अवतरला आहे असा भास त्यांना होतो. 


बालकवींच्या निसर्ग कवितांनी आनंदित न होणारा, तर व्याकूळतेच्या अनुभवाने डोळ्यांच्या कडा न टिपणारा आणि बालकवींच्या अकाली निधनाने न हळहळणारा रसिक सापडणे दुर्लभ आहे.
५ मे १९१८ रोजी बालकवी यांचे निधन झाले.


बालकवींची साहित्य संपदा :