होळी आणि सप्तरंगी रंगपंचमी


आपले भारतीय संस्कृती विविध सणांनी समृद्ध आहे. प्रत्येक सणाचे महत्व वेगळे, थाट वेगळा! त्यातील अबालवृद्धांना आवडणारा सण म्हणजे होळी आणि त्यापाठोपाठ येणारी रंगपंचमी.

होळी आणि रंगपंचमी म्हणजे दुधात साखर !
होळीच्या दिवशी सानथोर माणसे म्हणजे सर्व आधीपासूनच लाकूड फाटा जमवून ठेवतात. सायंकाळी गोवऱ्या आणि लाकडे पेटवून या होळीभोवती स्त्रिया फेर धरतात. मुले टीमकी वाजवतात. अग्नीच्या साक्षीने नावडत्यांच्या नावाने 'शिमगा' करतात, बोंबा मारतात. अपप्रवृत्त, दृष्टप्रवृत्तीचा नाश, त्याग करणे हा या सणांचा प्रमुख उद्देश आहे.

होळी आणि पुरणपोळी समीकरण एक प्राचीन परंपरा आहे.


HAPPY RANGPACHMI
रंगपंचमी आणि होळी 

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत होळी साजरी करण्याचा वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोकणातील होळी 'शिमगा' हा अगदी मोठ्ठा सण. पंचमीपासून रोज रात्री दहा दिवस 'होम' पेटवून त्या भोवती फिर धरून गाणी म्हटली जातात. पौर्णिमेच्या दिवशी मुख्य होळीचा होम. दहा दिवस देवांच्या पालख्या घरोघरी वाड्यांतून नाचवल्या जातात. त्या होळीच्या होमाभोवती नाचवल्या जातात.

मथुरेत तर या सणाचे अन्नसाधारण महत्त्व आहे. काहीजण त्याच दिवसापासून तर काही जण दुसऱ्या दिवशी धुळवड खेळतात. हीच त्यांची रंगपंचमी! शिवाय फाल्गुन वद्य पंचमीला रंगपंचमी साजरी केली जातेच.

आता काळानुरूप होळी आणि रंगपंचमी साजरे करण्याचे स्वरूप बदलले आहे. गावाकडे प्राचीन परंपरेनुसार, तर शहरांमध्ये बदललेल्या स्वरूपात होळी आणि रंगपंचमी साजरी होताना दिसते. शहरी भागात 'इको फ्रेंडली' होळी करण्याचे प्रमाण वाढते आहे. तसेच रंगांमध्ये केमिकल्सचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने त्यामुळे त्वचेचे विकार होण्याची आणि डोळ्यांना इजा होऊन अंधत्व येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी पाने, फुले, फळे, भाज्या यांपासून नैसर्गिक रंग तयार करतात. ते वापरून वरील धोका टाळता येतो.

अलीकडे शहरांमध्ये मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये सार्वजनिक स्वरूपातील रंग खेळले जातात. मोठ्या हौदामध्ये रंग तयार करून येणाऱ्या-जाणाऱ्या अंगावर टाकला जातो. मग कोणी रागावले तर - बुरा ना मानो, होली है ! म्हणून हे असे गोड आवाजात म्हटले जाते.

असा दृष्ट प्रवृत्तींचा नाश करणारा आणि सप्तरंगात बुडवणारा सण म्हणजे, होळी आणि रंगपंचमी !